फार काही विशेष अशी रेसिपी नाही ही. पण खरड फळ्यावर चर्चा चालू होती की इकडच्या थंड (होय होय अमेरिकेत .. झाहीरात झाहीरात) हवामानात इडलीचं पीठ लवकर आंबतच नाही, तर काय करावं. मी पण याच कर्माला कंटाळून ह्या रेसिपी च्या मागे लागले.

मुळात इडली किंवा डोसा करणं म्हणजे किमान २-३ दिवसाचं काम आणि नियोजन. पण त्यामुळे आत्ता लगेच कोणाला इडली खायची इच्छा झाली तर काय ? बाहेरून पार्सल मागवता येतचं, पण घरी केल्या की भरपूर मनसोक्त खाता येतात. तसं बाजारात इंस्टंट इडली मिक्स मिळतं. पण दर वेळी ते विकत आणण्यापेक्षा जर तसंच घरीच करता आल तर मस्तच.. म्हणून जरा शोधाशोध केली (गुगल वर हो.. कुठे दुसरीकडे जाणार म्हणते मी), तर काही काही रेसीपीज मिळाल्या, पण त्या सगळ्यात तांदुळाच पीठ वापरलं होत. पण इडली कशी छान रवाळ असली पाहिजे हे डोक्यात फिट्ट बसल होत आणि तांदुळाच्या पिठीने ती तशी होईल असं वाटेना. खूप पूर्वी आईने एक इंस्टंट पिठांसाठी १ का २ दिवसाचा क्लास केला होता त्याच्या नोट्स वाचलेल्या अंधुक आठवत होत्या. त्यावरून एक प्रयोग करून बघू म्हणून ठरवलं.

नवरा त्या दरम्यान इंडिअन ग्रोसिरी मधे जाणारच असल्या मुळे त्याला उडदाच पीठ तिथे मिळतंय का ते बघायला आणि मिळत असेल तर आणायला सांगितलं. त्याला भयानक इडली आवडते. इतकी कि सकाळ दुपार संध्याकाळ तो इडली खावू शकतो. त्यामुळे तो पण खूप खुश झाला.
तर चला ती रेसिपी बघूच आपण:

साहित्य:

इडली रवा : २ वाट्या
उडीद पीठ : १ वाटी
मेथीची पावडर (असली तर): २ चिमुट
सायट्रिक अॅसीड : १ टी स्पून (तुम्हाला किती आंबट आवडते त्याप्रमाणे थोड कमी जास्त करा)
इनो सॉल्ट : दीड टी स्पून ( हे चांगल नवीन फ्रेश पाहिजे. म्हणजे १-२ महिन्यात आणलेलं असाव.)
मीठ : १ टी स्पून किंवा चवीप्रमाणे (हल्ली सगळीकडे सारखाच खारटपणा असलेलं मीठ नसतं म्हणून अंदाज आपला आपला )
तेल : २-३ टी स्पून
पाणी : अंदाजे

कृती:

सगळ्यात पहिले इडली रवा, उडदाच पीठ, मीठ, सायट्रिक अॅसीड आणि मेथीची पावडर मिक्स करून त्यात हळू हळू पाणी घालत मिक्स करा. पाणी इतकच घाला कि पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसेल. पीठ चमच्यातून जस्ट खाली पडेल इतक पातळ असावं. हे साधारण १५-२० मिनिट बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत इडलीच्या साच्यांना तेलाचा हात लावून घ्या. मधल्या वेळात हव तर नारळाची चटणी वाटून घ्या. एकीकडे गॅस वर इडली पात्र किंवा कुकर मधे पाणी घालून मोठ्या आचेवर ठेवा.

१५-२० मिनिटानंतर इडली रवा फुगल्यामुळे पीठ खूप घट्ट होतं. तसं ते झालं असेल तर अजून थोड पाणी घालून मिक्स करून घ्या. घरात शिळा उरलेला थोडा भात असेल तर साधारण एक मुद भात कुस्करून यात घालू शकता. त्याने ईडली आणखीनच सॉफ्ट व्हायला मदत होईल. सगळ्यात शेवटी त्यात इनो सॉल्ट घालून पटापट मिश्रण हलवा. पीठामधल्या सायट्रिक अॅसीड आणि इनो साल्ट मुळे पीठ मस्त फुगेल आणि त्यात हवेचे बुडबुडे दिसतील.

आता अजिबात वेळ न घालवता पीठ इडली साच्यांमधे ओता आणि इडली स्टँड इडलीपात्रात ठेवून झाकण घट्ट लावून १०-१२ मिनिट चांगली वाफ काढा.
१०-१२ मिनिटानंतर गॅस बंद करून २ मिनिटानंतर झाकण उघडून गरम असतानाच इडल्या साच्यातून काढून घ्या.

घरी डाळ तांदूळ भिजवून वाटून आणि आंबवून करतो त्या इडल्यांच्या खूप जवळ टेस्ट आणि टेक्शर येतं या इडलीचं. आणि होते पण अर्धा पाऊण तासात. याला लागणार साहित्य घरात भरपूर आणून ठेवलं तरी लवकर खराब होत नाही.
करा मग अश्या झटपट इडल्या आणि सांगा कश्या झाल्या ते.
अरे हो हा इडल्यांचा फोटो.. तो टाकला नसता तर विश्वास नसता बसला ना.

instant idali

घरी आंबवून इडल्या करणार असाल तर काही टीप्सः
एका कांद्याच्या ४ फोडी करून त्या इडलीच्या पिठात घालाव्यात. किंवा एका साउथ इंडिअन शेजारणीच्या सल्ल्यानुसार इडलीच पीठ वाटताना थोडे चुरमुरे भिजवून ते पण वाटावेत.
इडलीच पीठ ओव्हानचा दिवा लावून त्यात ठेवावे. ओव्हन ला दिवा लावायची सोय नसेल तर आधी ओव्हन चांगला प्री हिट करून मग त्या उबदार वातावरणात पीठ ठेवावं.